धक्कादायक… कंडक्टर कडून पीएमपी प्रवासी युवतीशी अश्लील कृत्य…
पुण्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, एकाच दिवशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि राहत्या सोसायटीत विनयभंगाच्या दोन गंभीर घटना घडल्या आहेत.
March 29, 2026
पुणे : पीएमपी प्रवासी युवतीशी अश्लील कृत्य करणाऱ्या वाहकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. आरिफ जलील शेख (वय ३५, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत युवतीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीविरुद्ध विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती अल्पवयीन आहे. ती २८ मार्च रोजी कात्रज आगारातून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होती.
आरोपी शेख हा पीएमपी वाहक (कंडक्टर) आहे. प्रवासादरम्यान त्याने युवतीला त्याचा मोबाइल क्रमांक देण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्यानंतर स्पर्श करुन विनयभंग केला. युवतीने आरडाओरडा केला. प्रवाशांनी बस थांबविली. युवतीकडे विचारणा केल्यानंतर वाहक शेख याने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. शेख याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.
अश्लील कृत्य प्रकरणी ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा
अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य केल्या प्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हिंगणे खुर्द परिसरातील एका सोसायटीत राहायला आहे. तक्रारदार महिलेच्या दहा वर्षांच्या मुलीला आरोपीने वाईट पद्धतीने स्पर्श केला. ही बाब तिने आईला सांगितले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक माधुरी काजळे तपास करत आहेत.
(स्रोत: लोकसत्ता)



