Pune Mayor Race: पुण्यात 10 व्या महिला महापौर कोण होणार? कोण बसणार खुर्चीवर? ही नावं चर्चेत
Pune Mayor Reservation 2026: पुणे महानगर पालिकेला लवकरच महापौर मिळणार आहे. पुणे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. महापौर पदाच्या शर्यतीमध्ये अनेक महिला नगरसेविकांचा समावेश आहे.

-
पुणे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव
- भाजपच्या अनेक महिला नगरसेविका महापौरपदाच्या शर्यतीत
- 119 जागांसह भाजपकडे स्पष्ट बहुमत
-
पुण्याला लवकरच 10 वी महिला महापौर मिळणार
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आज सर्वांचे लक्ष प्रतिष्ठेच्या महापौरपदाकडे लागले होते. या महापालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता ही प्रक्रिया मुंबईत पार पडली. मुंबई महापालिकेचा महापौर हा खुल्या प्रवर्गातील असेल तर पुणे शहराचा महापौर पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिला असं पडलं आहे. त्यामुळे आता पुण्यात महापौरपदाचा मान कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महापौर पद महिलांसाठी राखीव झाल्याने भाजपच्या अनेक जणांचे महापौर होण्याचे स्वप्न अर्धवट राहणार आहे हे नक्की.
पुण्याचे महापौर पद खुल्या गटातील महिलांसाठी राखीव झाल्याने मानसी देशपांडे, वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे यांच्यासह इतर महिला नगरसेवकांची महापौर होण्याची संधी वाढली आहे. महापालिकेतील १६५ जागांपैकी तब्बल ११९ जागांवर भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) मदतीने एकहाती सत्ता मिळविली आहे. गेली चार वर्षे प्रशासकाच्या हाती असलेला कारभार आता पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हाती येणार आहे. यंदा महापालिकेच्या सभागृहात सर्व पक्षीय विचार केला तर ६७ महिला नगरसेविका उपस्थितीत असणार आहेत.

