’पुणे: कोंढवा आणि पारगे नगर परिसरात गेल्या दोन दशकांपासून खंडणीखोरी, दमदाटी आणि फसवणुकीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या ‘शफी पठाण टोळी’च्या कारवायांनी आता कहर गाठला आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला असला, तरी नागरिक आता या टोळीवर ‘मोका’ (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
नेमके काय आहे प्रकरण?कोंढवा खुर्द येथे बांधकाम करणाऱ्या एका व्यावसायिकाला “येथे काम करायचे असेल तर मला विचारून करावे लागेल,” अशी दमदाटी करत शफी गुलजारखान पठाण आणि त्याच्या साथीदारांनी महापालिकेत खोट्या तक्रारी केल्या. या तक्रारींच्या आधारे बांधकाम पाडण्याची धमकी देऊन या टोळीने संबंधित व्यावसायिकाकडून तब्बल १५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक आरोप आहे.
२००२ पासून गुन्हेगारीचा इतिहास: ही टोळी केवळ एका प्रकरणापुरती मर्यादित नसून, २००२ पासून कोंढवा परिसरात त्यांची दहशत आहे.
मशिदीच्या नावाचा वापर: अलाउद्दीन मशिदीच्या विकासाच्या नावाखाली या टोळीने अनेक नागरिकांकडून निधी गोळा केला. मात्र, २००२ पासून आजतागायत कोणतेही विकासकाम झाले नाही, उलट या नावाचा वापर करून नागरिकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे.
गुन्ह्यांची मालिका: या टोळीच्या सदस्यांवर ८ ते १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०२३ आणि २०२४ मध्ये या टोळीतील सदस्यांना ‘MPID’ कायद्यांतर्गत कारावासही झाला आहे. वारंवार कारावासाची शिक्षा होऊनही त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणताही बदल झालेला नाही, हे अत्यंत गंभीर आहे.
पुणे पोलिसांची कसोटी: कोंढवा परिसरात सध्या या टोळीची इतकी दहशत आहे की, सामान्य नागरिक आणि छोटे व्यावसायिक उघडपणे तक्रार करण्यास धजत नाहीत. १५ लाखांच्या खंडणी प्रकरणातील आरोपींवर आता केवळ सामान्य गुन्हे दाखल करून पोलीस शांत बसणार की, या टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ‘मोका’ लावणार? याकडे आता संपूर्ण पुणे शहराचे लक्ष लागले आहे.
आम्ही विचारतोय प्रश्न: १. सराईत गुन्हेगारांना पाठीकोण घालत आहे?
२. एकाच टोळीवर दरवर्षी गुन्हे दाखल होऊनही ‘मोका’ का लावला जात नाही?
३. मशिदीच्या नावाखाली गरिबांची लूट करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश कधी होणार?
Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!