क्राईम
Trending

फरार गुंड नीलेश घायवळचा ‘धमाका’ प्लॅन फेल! कोथरूड गोळीबार प्रकरणात ६,४५५ पानांचे आरोपपत्र दाखल; टोळीच्या ९ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई

पुणे | २३ जानेवारी २०२६ | पुणे तक टीम

पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा सध्या परदेशात फरार असला तरी त्याच्या टोळीला पुणे पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार आणि हल्ल्याच्या प्रकरणात घायवळ टोळीतील ९ आरोपींविरुद्ध विशेष मकोका न्यायालयात तब्बल ६,४५५ पानांचे जाडजूड आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

१७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री कोथरूडमध्ये प्रकाश धुमाळ (वय ३६) यांच्यावर गोळीबार झाला होता. त्याच रात्री वैभव साठे (वय १९) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. हा सर्व कट गणेशोत्सवादरम्यान (९ सप्टेंबरला विसर्जनाच्या दिवशी) घायवळने रचला होता, असे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, घायवळने आपल्या साथीदारांना फोनवरून सांगितले की, “कोथरूडमध्ये आपली दहशत कमी झाली आहे. येथे मोठा धमाका करून भीती निर्माण करा.” त्यासाठी त्याने शस्त्रे, पैसे आणि कायदेशीर मदत देण्याचे आश्वासन दिले. मयूर कुंबरे याने थेट धुमाळवर गोळी झाडली, तर इतरांनी हल्ल्यात सहभाग घेतला.

आरोपपत्रात घायवळचा मुख्य सूत्रधार म्हणून उल्लेख आहे. तो बनावट पासपोर्टने युनायटेड किंगडमला पळून गेला. ब्रिटिश उच्चायुक्तालयाने ऑक्टोबरमध्ये त्याचा यूकेत असल्याची पुष्टी केली. आता इंटरपोलच्या मदतीने त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसांनी टोळीची १८ बँक खाती गोठवली, २६ मालमत्ता जप्त केल्या आणि ईडीकडे मनी लाँड्रिंगची तक्रार पाठवली. घायवळच्या भावासह इतर नातेवाईकही फरार आहेत.

पुणे तक अपडेट: घायवळ टोळीविरुद्ध सप्टेंबरपासून ११ गुन्हे दाखल, त्यापैकी ५ वर मकोका लावला. पुणे पोलिसांची कारवाई सुरूच…

तुम्हाला ही बातमी कशी वाटली? कमेंट करा आणि शेअर करा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!